गडचिरोली - सहा लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्याने बुधवारी (दि. 23 जून) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. शशीकला ऊर्फ गुनी ऊर्फ झुरी ऊर्फ अंजु आसाराम आचला असे तिचे नाव आहे. चकमक, जाळपोळ करणे असे विविध पोलिस गुन्हे दाखल तिच्यावर होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे बांधण्यात येत असलेल्या नवजीवन वसाहतीत विविध कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी या महिला नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले.
शशीकलावर एकूण 20 गुन्हे होते दाखल
शशीकला ही मोठा झेलीया, ता. धानोरा येथील रहिवासी असून डिसेंबर 2006 मध्ये ती टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. सध्या ती ए.सी.एम, पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे 15, जाळपोळ 1 व इतर 4 असे एकूण 20 गुन्हे दाखल असून शासनाने तिच्यावर 6 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे 2019 ते 2021 दरम्यान एकूण 39 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये 4 डिव्हीसी, 2 दलम कमांडर, 3 उपकमांडर, 29 सदस्य व 1 जनमिलीशिया यांचा समावेश आहे.
आत्मसर्मपीत नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण कल्याण कार्डचे अनावरण
जिल्हाभरात गडचिरोली पोलीस आदिवासी बांधवांकरीता जनजागरण मेळावे, रोजगार मेळावे, महिला मेळावे, ग्रामभेटी याचे आयोजन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी आत्मसर्मपीत नक्षलवाद्यांसाठी नवजीवन वसाहत येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते नवजीवन वसाहत बोर्डचे अनावरण, वृक्षारोपण व आत्मसमर्पण कल्याण कार्डचे अनावरण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते आत्मसर्मपीत नक्षलवाद्यांचा सत्कार करण्यात आला.
नक्षलवाद्यांना आत्मनिर्भर बनवणार - अंकित गोयल
"नवजीवन वसाहत येथे विदयुतीकरण, पाण्याची सुविधा तसेच त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच शिवणकाम, मोटार ड्रायकिंग, गवंडीकाम याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणार आहोत. विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीत सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल," असे अंकित गोयल सांगितले. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेर सोमय मुंडे उपस्थित होते.
हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यातून डेल्टा प्लसचे नमुने गोळा केले जाणार - राजेश टोपे