गडचिरोली- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे, २४ तासात दुसऱ्यांदा पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग काल सायंकाळी ५ वाजतापासून बंद झाला आहे. त्यामुळे, तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क दोन दिवसांपासून तुटलेलाच आहे. यातच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी रस्त्यावरून चक्क नावेद्वारे प्रवास करावा लागत असल्याचे दृश्य भामरागडमध्ये दिसून येत आहे. तर, ६ प्रमुख मार्ग दोन दिवसांपासून बंद आहेत.
रविवारी पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने येथील बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली आली होती. मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी पाणी ओसरल्यावर भामरागड-आलापल्ली मार्ग सुरू झाला होता. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने भामरागड लगतची पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्या दुथडी भरून वाहत असल्याने काल सायंकाळच्या सुमारास पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढले.
भामरागड गावातही पाणी शिरल्याने पोलीस व महसूल प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. काही नागरिक स्वतः सुरक्षित स्थळी जात असून रस्त्यावर पाणी असल्याने नावेचा वापर करावा लागत आहे. पुरामुळे भामरागड-आलापल्ली मुख्य मार्ग बंद असल्याने भामरागड तालुक्यातील १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. तर, सोमनपली नाल्यामुळे असरअली-सोमनपल्ली, कोरेतोगू नाल्यामुळे रोमपली-झिंगाणूर, अमराजी नाल्यामुळे आलापल्ली-सिरोंचा, आरेवाडा नाल्यामुळे कसनसूर-कोठी व पिडमिली नाल्यामुळे हेमलकसा-करमपल्ली हे प्रमुख मार्ग दोन ते तीन दिवसांपासून बंदच आहेत.
हेही वाचा- जिल्हा परिषदेतील 2 कोटी 86 लाख अपहार प्रकरणात आणखी दोघांना अटक; 1 किलो सोने जप्त