गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा सर्कलचे मंडळ अधिकारी विलास माधवराव मुप्पीडवार (वय 49) याला 2 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रंगेहाथ पकडत अटक केली. वारसा हक्काप्रमाणे शेतजमिनीवर नाव चढवण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार हे मालेरमाल येथील रहिवासी असून शेतीचा व्यवसाय करतात. त्यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर वारसांचे नाव फेरफार करून वडीलोपार्जीत जमिनीवर आपले तसेच इतर वारसादारांचे नाव चढविण्याच्या कामासाठी मंडळ अधिकारी विलास मुप्पीडवार यांनी 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. याची गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवि राजुलवार यांनी मंडळ अधिकाऱ्याविरुध्द सापळा रचला. मंडळ अधिकारी विलास मुपीडवार यांना मागणी करून लाच रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले असून त्याविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवि राजुलवार, प्रमोद ढोरे, सतिश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, तुळशिराम नवघरे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.