गडचिरोली - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही दिवसाचा अवधी असताना 5 वर्षांमध्ये कधीही ओबीसींचा महामेळावा न घेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपतर्फे चामोर्शी येथे शनिवारी मेळावा घेण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या ओबीसी संघटनेने भाजप पक्षाच्या मेळाव्यातच प्रवेश करुन काळे झेंडे दाखविले. त्यानंतर सरकार विरुद्ध घोषणा दिल्या. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : गडचिरोलीत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यावरुन 6 टक्क्यांवर आणण्यात आले. त्यामुळे 2003 पासून वर्ग 3 व 4 पदभरतीतून ओबीसी प्रवर्गातून बाद झाले आहेत. जिल्ह्यातील साडे बेंचाळीस टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ओबीसी संघटनांचे व ओबीसी समूहातील पोट जातीय संघटनांचे कित्येक आंदोलन होत आहेत. आजपर्यंत सत्तेवर आलेल्या विविध पक्षाने ओबीसीची दिशाभूल केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ओबीसींच्या आरक्षण या मुद्द्यावर भाजप सत्तेत आली. दर निवडणुकीच्या वेळेस ओबीसींना आश्वासन देण्याचे काम करीत आहे, असा आरोप ओबीसी संघटनेने केला.
हेही वाचा - भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं
मुख्यमंत्री यांनी महाजनादेश यात्रेवेळी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ओबीसींचे आरक्षण 15 दिवसाच्या आत पूर्वत करीन, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन फोल ठरले. त्यानंतर कुणबी गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्यमंत्री परिणय फुंके यांनी सुद्धा ओबीसींच्या आरक्षणावर भाष्य केले. मात्र, हे सुद्धा आश्वासन फोल ठरले. आता आचारसंहिता लागू होण्यासाठी 4 ते 5 दिवस बाकी असताना 5 वर्षांमध्ये कधीही ओबीसींचा महामेळावा न घेता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेळावा घेतला. याचा निषेध म्हणून भाजप पक्षाच्या मेळाव्यातच ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेऊन काळे झेंडे दाखवून व नारे बाजी करुन निषेध केला.
यावेळी ओबीसीं महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे, राहुल भांडेकर, पंकज खोबे, मनोज पोरटे, रमेश कोठारे, गोकुलदास झाडे, पियुष गव्हारे, गणेश भोयर, वामन किन्हेकर, संदीप तिमांडे, तुषार मंगर, तुकाराम आभारे, लोमेश भगत, देवेंद्र सातपुते, संदीप सहारे, स्वप्नील कुकडे, माळी समाज संघाचे जिल्हा संयोजक सुनील कावळे, मारोती वनकर आणि धनराज वासेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.