गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा 77 हजार 526 मतांनी पराभव केला. त्यामुळे शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयापासून गडचिरोली शहरातून विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
गुरुवारी गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयामध्ये मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालली. निकाल जाहीर होण्याला जवळपास रात्री 1 ते दीड वाजले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना गुरुवारी मिरवणूक काढता आली नाही. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच जुलूस काढण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. सायंकाळी 6 वाजता चामोर्शी मार्गावरील भाजप जनसंपर्क कार्यालयापासून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जुलूस काढण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मुख्य मार्गाने फटाके फोडत विजयाचा जल्लोष करण्यात आला.
या विजयी मिरवणुकीत आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, प्रशांत वाघरे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे , शिवसेनेचे रामकीरीत यादव, परिवर्तन पॅनलचे सुरेंद्रसिंग चंदेल, शेडमाके, अनिल पोहनकर, अविनाश विश्रोजवार, सुधाकरराव यनगंधलवार, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार, आमगावचे शहरध्यक्ष घनश्याम अग्रवाल, चांगदेव फाये व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.