गडचिरोली - कोर्ची मार्गे कुरखेडाकडे येत असताना लेंढारी नाल्याजवळ झालेल्या कारच्या अपघातात भाजपचे ४ जिल्हा परिषद सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. चारही सदस्य गडचिरोली येथे जिल्हा परिषद सभापती निवडणुकीसाठी जात होते. मात्र, वाटेत त्यांचा अपघात झाला.
ट्रकशी समोरासमोर धडक होत अनियंत्रित झालेली कार रस्त्याचा कडेला उतरल्याने हा अपघात घडला. यात जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, संपत आळे, नामदेव सोनटक्के व भाग्यवान टेकाम गंभीर जखमी झाले आहेत. आज गडचिरोली जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीकरीता भारतीय जनता पक्षाचे चारही सदस्य कारने एकत्रित कोरचीकडून गडचिरोलीला जाण्याकरीता निघाले होते. दरम्यान, १ मे रोजी नक्षल्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या लेंढारी नाल्याजवळ कारची विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक बसली. यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्त्याचा खाली उतरली. या अपघातात चारही सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक उपचारानंतर जखमींची रवानगी जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे करण्यात आली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आ. क्रिष्णा गजबे, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, कृषी सभापती नाना नाकाडे व भाजप पदाधिकारी व नागरिकानी रूग्नालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.
हेही वाचा- गडचिरोलीतील अतिदुर्गम गावात रंगल्या आदिवासींच्या क्रीडा स्पर्धा