गडचिरोली - जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्यास नक्षलवाद संपेल, असे विधान जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक सोयीसुविधा व दळणवळणाची साधने जिल्ह्यात उभी राहत असल्याचे ते म्हणाले. मंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते जिल्ह्यातील 27 कोटी रूपये कामांच्या शुभारंभासह 46 वाहने व ॲम्ब्यूलन्स, ऑक्सिजन प्लांट, जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
'500 कोटींचे रस्ते व पुलांच्या कामाला मंजूरी'
राज्य शासनाबरोबर केंद्राकडूनही चांगल्या प्रकारे जिल्ह्यासाठी मदत मिळत आहे. नुकतेच 500 को टींचे रस्ते व पुलांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रतीक्षेत असलेले मेडीकल कॉलेजही लवकरच अंतिम टप्प्यावर आणू, असे शिंदे म्हणाले.
'गडचिरोली बदल रही है'
गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामे, नवीन कामांचे शुभारंभ पाहून मला असे वाटतेय की 'अब गडचिरोली बदल रही है' असे उद्गार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. सद्या पालकमंत्री व आम्ही जिल्ह्यासाठी विकासाचे मोठे पाऊल टाकत आहोत. या आलेल्या वाहनांमुळे दुर्गम भागातील आरोग्य विषयक गरजा पुर्ण होतील, असे ते यावेळी म्हणाले. येत्या काळात गडचिरोलीसह चंद्रपूरसाठी नव्या पध्दतीचे आधुनिक आपत्तीमध्ये मदत करणारे वाहन पुरविणार असल्याचे यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते 200 ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे व बायोमेडीकल वेस्टेज व लाँड्रीचा शुभारंभही करण्यात आला. यानंतर कॉम्प्लेक्स परिसरातील स्मृती उद्यानाच्या 2.5 कोटी रूपये नूतनीकरण कामाचा शुभारंभही त्यांनी केला. कॉम्प्लेक्स परिसरातीलच नव्याने नूतनीकरण केलेला जलतरण तलावाचे उद्घाटन एकनाथ शिंदे व विजय वडेट्टीवार यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन कोर्टवर खेळून क्रीडा विषयक संदेश दिला.
क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
पोटेगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या नविन बांधकामाकाचे भूमिपूजनही करण्यात आले. याकरीता अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून रूपये 44.51 कोटीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार केले आहे. यातील 27 कोटी रूपयांना प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. पैकी बांधकामाकरीता रुपये 24 कोटी 31 लक्ष रूपयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. माहे ऑगस्ट 2021 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले असून नियोजित कालावधी 18 महिन्याचा आहे. कामामध्ये प्रशासकीय इमारत तयार करणे, इनडोअर हॉल, बॅडमिंटन हॉल, 2 सुरक्षारक्षक कक्ष सोबत 1 मुख्य प्रवेश द्वार, कृत्रिम धावपट्टी (Synthetic Track) बांधण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात जिल्हा क्रीडा संकुलाकरीता उपलब्ध असलेल्या जागेवर रुपये 35 कोटी खेळाकरीता नियोजित असून त्यात प्रेक्षक गॅलरी, मुलामुलींचे वसतीगृह, जलतरण तलाव, विविध खेळांचे मैदान, अंतर्गत रस्ते व नाल्या बांधकाम नियोजित आहे.
हेही वाचा - अतिदुर्गम भागात एकनाथ शिंदेंनी पोलिसांसोबत साजरा केले रक्षाबंधन