गडचिरोली - भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, नायब तहसीलदार सोनवणे यांनी नारगुंडा येथील प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नारगुंडा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी पायी चालून गावाची पाहणी केली. त्याचबरोबर स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
भेटी दरम्यान, नारगुंडा हद्दीतील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमकुही, पिडमिली (कोठी) येथील ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान तहसीलदार यांनी सर्व ग्रामस्थांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे आपणास त्वरित तहसील कार्यालयातून पुरवण्यात येतील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
सर्व गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या आम्ही पूर्णक्षमतेने सोडवण्याचा प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया यावेळी तहसीलदारांनी दिली. यावेळी प्रतिसाद फाउंडेशन, यवतमाळचे अध्यक्ष मनोज गुलाने व त्यांची टीम हजर होती. त्यांनी सर्व गावकऱ्यांना तहसीलदार यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच तहसीलदार यांच्या भेटीमुळे व त्यांनी केलेल्या मदतीमुळे सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.