गडचिरोली - नक्षलवाद्यांनी खून केलेल्या निष्पाप बेबी मडावी हिच्या स्मरणार्थ भामरागड तालुक्यातील धोडराज येथील मुख्य चौकात स्मारक बांधण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलातर्फे हे स्मारक बांधण्यात आले आहे. त्या निमित्ताने दिवंगत बेबी मडावीचे वडील गंगा मडावी आणि आई सोनी मडावी यांच्यासह पंचक्रोशीतील सुमारे दीड हजार नागरिकांनी नक्षलवाद्यांविरोधात धोडराज ते इरपणार, अशी 5 किमी रॅली काढून बेबीला श्रद्धांजली वाहिली आहे.
गावातील मुख्य चौकात बेबी मडावी महिला विकास मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. रॅलीवेळी उपस्थितांनी नक्षलवाद्यांना हद्दपार करा आणि विकासाची कास धरा, अशा घोषणा व्यक्त केली. तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागासह जिल्हाभरातील एकूण 58 ठिकाणी घेण्यात आलेल्या बेबी मडावी महिला विकास मेळाव्यात 9 ते 10 हजार महिलांनी सहभाग घेत प्रचंड प्रतिसाद नोंदविला.
मेळाव्यात उपस्थित महिलांना कायदेविषयक माहितीसह महिलांचे अधिकार याबद्दल जागृती करण्यात आली. शासनाच्या महिला सक्षमीकरणसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची माहिती देण्यात आली. गडचिरोली पोलीस दल जात प्रमाणपत्र मोफत काढण्यासाठी राबवित असलेल्या ‘प्रोजेक्ट प्रगती’कडून विषयक माहिती देण्यात आली. महिलांची मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली.
मेळाव्यास उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी वेळ देण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी समाजातील वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार प्रकट केले. यावेळी उपस्थित महिलांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - गडचिरोलीत 30 लाखांची सुगंधित तंबाखू जप्त