गडचिरोली- नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गडचिरोली विधानसभेत एक, अहेरी विधानसभेत एक, तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातून पाच जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे गडचिरोली येथे 16, आरमोरी विधानसभा क्षेत्रात 11 तर अहेरी विधानसभा क्षेत्रात 9 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही अहेरी विधानसभा क्षेत्रात दोन्ही पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्याने येथे 'आघाडीत बिघाडी' बघायला मिळणार आहे.
हेही वाचा- परिणय फुके यांनी मला षडयंत्र करून फसवले, आमदार चरण वाघमारेंचा आरोप
आज नामांकन मागे घेण्याच्या दिवशी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून शरद यादव सोनकुसरे-अपक्ष, निताराम झिंगर कुमरे-अपक्ष, अनिल पुडालक कुमरे-अपक्ष, वामन वंगणुजी सावसाकडे-अपक्ष, रमेश गोविंदा मानागडे-अपक्ष या पाच जणांनी नामांकन मागे घेतले. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून मन्साराम माधव आत्राम-अपक्ष तर अहेरी विधानसभा क्षेत्रातून संदीप मारुती कोरेत-अपक्ष यांनी माघार घेतली आहे.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंची गर्जना, शिवसेनेचा 'मुख्यमंत्री' करणार म्हणजे करणारच!
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी असतानाही या विधानसभा क्षेत्रात दोन्ही पक्षाने उमेदवार दिले आहेत. काँग्रेसतर्फे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम रिंगणात आहेत. नामांकन परत घेण्याच्या दिवशी कोणीतरी एक जण उमेदवारी मागे घेईल, अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, कुणीही माघार न घेतल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार आहे. या विधानसभा क्षेत्रात भाजपकडून विद्यमान आमदार माजी राज्यमंत्री अमरिश आत्राम रिंगणात असून कुणीही हरले तरी 'आत्राम'च आमदार होणार आहे.