गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या मामा तलावाच्या पूनर्बांधणी व बळकटीकरण या लेखाशिर्षकाखाली असलेल्या युनियन बँकेच्या खात्यातून बनावट धनादेशाच्या आधारे तब्बल 2 कोटी 86 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी गडचिरोलीत तक्रार दाखल केली. यावरून गडचिरोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा जलसंधारण अधिकारी भूमेश दमाहे यांनी तक्रार नोंदवली आहे. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या माजी मालगुजारी तलावाच्या पुनर्बांधणी व बळकटीकरण या लेखाशिर्षकाखाली युनियन बँक ऑफ इंडिया गडचिरोली येथे खाते आहे. या खात्यातील रक्कमेचा रोकडवहीचा ताळमेळ घेतला असता संबंधित खात्यातून २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपयांचा फरक आढळून आला.
दरम्यान गडचिरोली जिल्हा परिषदेने १८ सप्टेंबरला बँकेत जाऊन शहानिशा केली असता आरोपींनी त्यांचा जिल्हा परिषद जलसंधारण विभागाशी कोणताही संबंध व देणेघेणे नसताना मूळ चेकचा बनावट चेक तयार केला आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी स्कॅन केल्या. तसेच जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद यांच्या नावाचे बनावटी पत्र तयार केले. त्यामधून २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपयाचे बनावट चेक युनियन बँक ऑफ इंडियाकडे सादर करून आरोपींनी रक्कम काढली.
जिल्हा जलसंधारण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांच्या धनादेशावर असलेल्या स्वाक्षऱ्या स्कॅन करून बोगसपत्र ३ जून २०१९ ला युनियन बँकेत टाकले. ६ जूनला बनावटी पत्र व ७ जूनला धनादेश टाकून १० जूनला संबंधित पत्रात नमुद असलेल्या खात्यावर आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम वळवण्यात आली.
दरम्यान, युनियन बँकेतून शासकीय रक्कमेची अफरातफर झाल्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी धुमेश धमाणे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर करत आहेत.