गडचिरोली - जिल्ह्यातील दुर्गम भागात अजुनही रुग्णांना खाटेवरच रूग्णालयापर्यंत आणले जाते. दररोज पुढे येत असलेले हे विदारक चित्र कधी बदलणार, असा सवाल या भागातील लोकांना पडत आहे.


भामरगड तलुक्यातील लहेरी प्रथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरडपार गावातील एका आजारी महिलेला रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडली. यासाठी लाहेरी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. डॉ. संतोष नैताम यांनी रुग्णवाहीका पाठवली खरी परंतु कसेबसे कसरत करत गोपणार गावापर्यंत गाडी नेण्यात आली. मात्र, समोर आणखी दोन किमी अंतर मोरडपार रस्त्यावर मोठी नदी असल्याने पुढे जाणे शक्यच नव्हते. ग्रामस्थांनी नेहमी प्रमाणेच महिलेला खाटेवर झोपवून 4 किमी अंधरातून मोबाईलच्या प्रकाशाच्या सहाय्याने नदी पात्रातून मार्ग काढत वाहनापर्यंत आणले.



स्वातंत्र्य भेटून पर्वलोटले तरी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना या सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. रस्ते, वीज, आरोग्य सुविधा अजुनही समस्याच आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांअभावी 108 रुग्णवाहिका असुनही उपयोग होत नाही. अनेक रुग्णांना आजपर्यंत यामुळे होणाऱ्या विलंबामुळे उपचार वेळेत न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे दिवस कधी संपतील, वास्तव परिस्थिती बदलणार केंव्हा? असे प्रश्न जनसामान्य विचारत आहेत.