धुळे - भाजप-शिवसेना युतीचे धुळ्याचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिलला योगी आदित्यनाथ यांची धुळे शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने बंदी उठविल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची धुळ्यात सभा होणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांचीदेखील २३ एप्रिलला धुळे शहरात सभा होणार आहे.
आपल्या प्रखर आणि जहाल भाषणांसाठी प्रसिद्ध असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करीत त्यांना ७२ तास प्रचार करण्यास बंदी घातली होती. यामुळे १८ एप्रिलला धुळे शहरात होणारी त्यांची सभा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची सभा आता २४ एप्रिलला होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. शहरातील जुने अमळनेर स्टॅण्ड येथे ही सभा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. धुळे शहरात प्रथमच योगी आदित्यनाथ यांची सभा होणार असून ते सभेत काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
तसेच धुळे लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांच्या प्रचारार्थ २३ एप्रिलला प्रकाश आंबेडकर यांचीदेखील सभा आयोजित करण्यात आली आहे. धुळे शहरातील जेल रोड भागात ही सभा होणार असून या सभेत प्रकाश आंबेडकर सत्ताधाऱ्यांवर काय टीका करतात, हे बघणे महत्वाचे असणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघासाठी शेवटच्या अर्थात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे प्रचाराचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय दिग्गजांच्या प्रचारतोफा धडाडणार आहेत.