धुळे - कोरोना पॉझिटिव्हच्या कुटुंबातील संपर्कात आलेल्या व्रुध्द दाम्पत्याला धुळे येथे तपासणीसाठी रवाना केले. मात्र, ते दाम्पत्य चक्क गुरूवारी सायंकाळी प्लॉटवर दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासनाने चौकशी केली असता, विना तपासणी दाम्पत्य धुळे येथून शिरपूर परतल्याचे उघड झाले. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी उघड झाला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील जवानाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी आणि मुलीचा कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह आला होता. याच कुटुंबात वृध्द दाम्पत्याचाही समावेश असल्याने दाम्पत्याला शिरपूर येथील कोव्हिड सेंटर येथे पाठवण्यात आले होते.
हेही वाचा - जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच मदत नाही - राजू शेट्टी
गुरूवारी १४ मे रोजी सकाळी त्या दाम्पत्याला धुळे येथे रुग्णवाहीकेने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, सायंकाळी हे दाम्पत्य शिरपूर शहरातील पांडुरंग नगर येथील त्यांच्या प्लॉटवर आल्याचे येथील नागरिकांना दिसुन आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत, नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता या दाम्पत्याची तपासणी झाली नसल्याचे उघड झाले. तपासणी झालीच नाही तर जिल्हा रूग्णालयातून प्रशासनाने या दाम्पत्याला परत जाऊ कसे दिले? हे दाम्पत्य विनातपासणी शिरपूर येथील प्लॉटपर्यंत कसे पोहचले? दाम्पत्याचा विनातपासणी परतीचा प्रवास कसा शक्य झाला याची सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य कारवाई होणे गरजेचे आहे.