धुळे - तालुक्यातील नंदाणे येथे हिस्से वाटणीवरून घरात घुसून लोखंडी रॉड, काठ्या व हाताबुक्यांनी बेदम मारहाण करून एकाचा खून करण्यात आला. याप्रकरणी मृताच्या आईने मुलींना सोबत घेत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे. दोघा बहिणींसह आठ जणांवर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतिलाल रूपचंद अहिरे (वय ४५, रा. नंदाणे) असे मृताचे नाव आहे. याबाबत त्याचा मुलगा नितीन रतिलाल पाटील याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीवरून वडिलोपार्जीत शेतजमीन व हिस्से वाटणीवरून वाद सुरू आहे. त्यातून २७ मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर भगवान ठाकरे याने लोखंडी रॉडने नितीनसह त्याचा वडील रतिलाल यांना मारहाण केली. तर आत्या मंगलबाई भगवान ठाकरे, सरलाबाई संजय सावळे व संजय गोकुळ सावळे, दीपक संजय सावळे, ज्ञानेश्वर संजय सावळे, हेमराज भगवान ठाकरे, येडबाई रूपचंद अहिरे यांनी काठ्या व हाताबुक्यांनी दोघांसह आईला बेदम मारहाण केली. त्यात नितीन व त्याचे वडील रतिलाल हे गंभीर जखमी झाले. दोघांवर सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान रतिलाल अहिरे यांचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यानुसार वरील आठ जणांवर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे