धुळे - साक्री तालुक्यातील दहिवेल-छडवेल रस्त्यालगत असलेल्या हॉटेल नवरंग येथे नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत विविध कंपन्यांची अवैध दारू जप्त करण्यात आली. दारूसह दोन वाहने असा एकूण 65 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळाली होती गुप्त माहिती -
दहिवेल-छडवेल रस्त्यालगत असलेल्या हॉटेलवर अवैधरित्या दारू साठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने हॉटेलवर कारवाई केली. यात गोवा राज्य निर्मित विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात संशयित आरोपी मुकेश अरुण चौधरी (वय 30 रा. अनकवाडे, ता. शहादा) याला अटक करण्यात आली. आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर एम फुलझळके, दुय्यम निरीक्षक एसएस रावते, डी एन पोटे, जवान शिंदे विठ्ठला हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात अवैध दारूची सर्रास होते वाहतूक -
धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अवैध दारू जप्त करण्याच्या अनेक कारवाया झाल्या आहेत. यावरून असे लक्षात येते की, अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.