धुळे - कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता व शासनाने लावलेल्या नवीन निर्बंधांमुळे श्री राम नवमी अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रशासनाने आजपासून सकाळी ७ ते ११ या वेळात नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी मुभा दिलेली आहे. आग्रा रोडवरील श्री राम मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात राम नवमी साजरी होत असते. मोठे भंडारे आणि महाप्रसादाचे वाटप यासारखे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात.परंतु या वर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व मंदिराचे उपाध्यक्ष श्री मोरांकर यांच्या निधनामुळे मंदिराच्या सदस्यांनी साध्या पद्धतीने आरती करत श्री राम जन्मोत्सव साजरा केला.
शहरातील अतिशय पुरातन असलेल्या श्री राम मंदिरात मोठ्या उत्सवात श्री राम जन्मोत्सव साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षांपासून कोरोनामुळे श्री राम जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. याही वर्षी राम नवमी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. भाविकांना यावर्षी रामाचे दर्शन बंद दारातून घ्यावे लागले. सोशल डिस्टंट पाळून सगळ्या भाविकांनी श्री रामाचे दर्शन घेतले. सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत भाविकांनी दर्शन घेतले नंतर १२ वाजेच्या सुमारास सजवलेल्या पाळण्यात श्री रामाची मूर्ती ठेऊन श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष अभय नाशिककर व मीनल नाशिककर यांच्या हस्ते आरती केली. याप्रसंगी अजय नाशिककर, प्रशांत विसपुते, सुभाष कांकरिया, विजय पाच्छापुरकर, भाग्यश्री कुलकर्णी, विनोद मोरणकर, प्रदीप जाधव, गणेश मोरे, हिरामण गवळी, राजू महाराज आदी उपस्थित होते.
मंदिरातील मुर्तींचे वैशिष्ट्य
धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील श्री राम मंदिरात असलेल्या रामाच्या मूर्तीत वेगळेपण म्हणजे श्री रामाच्या मांडीवर सीता माता बसलेल्या आहेत. श्री रामाच्या मांडीवर सीता माता बसलेल्या अश्या मुर्त्या या भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत. त्यातील एक धुळे आणि दुसरी म्हणजे हिमाचल प्रदेशातील कांगडा याठिकाणी. त्या सोबत फक्त राम, लक्ष्मण, सीता व हनुमानसोबत भरत आणि अंगत असा संपूर्ण राम दरबार असल्याचे मंदिराच्या ट्रस्टीनी सांगितले.
कोरोनाचे संकट जाण्याची केली प्रार्थना
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव शहरासह देशातूनच कायमचा निघून जावा, अशी प्रार्थना देखील श्री राम जन्मोत्सवा निमित्ताने आरती प्रसंगी करण्यात आली.