धुळे - तालुक्यातील निमगूल येथे भाजपच्या वतीने विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मद्य प्राशन केलेल्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी शोभा जाधव यांच्या घरात गुलाल फेकला. याप्रकरणी शोभा जाधव या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकलानंतर भाजपच्या वतीने धुळे तालुक्यातील निमगूल येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गावातून जात होती, काँग्रेसच्या महिला पदाधिकारी शोभा जाधव यांच्या घरासमोरून जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकला.
यावेळी घरात शोभा जाधव यांच्या सूनबाई एकट्या होत्या. या कार्यकर्त्यांनी वॉलकंपाऊंडचे गेट उघडून हे कृत्य केले. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मद्य प्राशन केले होते, असा आरोप शोभा जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी शोभा जाधव या धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी त्यांचा तक्रार अर्ज दाखल करून घेतला. मात्र, गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असून या दबावापोटी ते गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप शोभा जाधव यांनी केला आहे. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शोभा जाधव यांनी केली आहे.