धुळे - सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. आपल्या मागण्यांबाबत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत चर्चा झाली.
वनहक्क कायद्याप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित असलेले सर्व वनदावे तात्काळ मंजूर करावीत, वनखात्याने दाखल केलेले 'अ' परिपत्रक रद्द करावे, पात्र वन दावेदार यांना पूर्ण मालकीचा ७/१२ उतारा द्यावा, दुष्काळाबाबत राष्ट्रीय आपत्ती धोरणांतर्गत कार्यवाही व्हावी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतीमालाला योग्य तो हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना आरोग्य विम्याचा लाभ मिळावा यासह तब्बल २२ मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देता हा मोर्चा निघाल्याने पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. या मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत, या आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले.