धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात गुरुवारी बॅनर फाडल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे संतप्त जमावाने आमदार काशिराम पावरा यांचे वाहनदेखील फोडले. आमदारांच्या वाहनासह तहसीलदार आणि पोलिसांची 7 ते 8 वाहने जमावाने फोडली आहेत.
200 जणांवर गुन्हे दाखल : दोन गटातील वादानंतर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान या घटनेत तीन ते चार स्थानिक नागरिक आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर विविध ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 20 संशयितांना ताब्यात घेतले असून कोम्बिग ऑपरेशन सुरू आहे. तर काहींना अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी याप्रकरणी दिली.
वाद पेटला : क्रांतीदिनी 9 ऑगस्ट रोजी दोन समाजामध्ये वाद होऊन हाणामारी झाली होती. हा वाद मिटवण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी आमदार काशिराम पावरा यांच्यासह काही अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमाव होता. आदिवासी आमदार असूनही आदिवासींना न भेटता आधी दुसऱ्या गटाला भेटण्यासाठी गेले म्हणून आदिवासी जमाव संतप्त झाला. त्यामुळे जमाव हिंसक होत त्यांनी दगडफेक सुरू केली. दुपारपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दगडफेक आणि तोडफोड सुरू होती. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. शिरपूरसह शिंदखेडा, साक्री, धुळे तालुका येथील पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा-