धुळे - धुळे हा खान्देशातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजवर हा जिल्हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघातील विविध प्रश्न आणि विकासाचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी या मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना मैदानात उतरवले आहे. तर या दोघांसमोर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटेंचे आव्हान असणार आहे.
मतदारसंघाची पार्श्वभूमी
१९९६ ते २०१४ पर्यंत सलग १८ वर्ष या धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार विजयी झाले आहेत. २०१४ ला शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या डॉ. सुभाष भामरेंनी शिरपूरच्या अमरीश पटेलांचा पराभव केला होता. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांना ५ लाख २९ हजार ४५० मते मिळाली होती. सलग १८ वर्ष भाजपचे उमेदवार या मतदार संघातून विजयी झाले असले तरी आजवर या मतदारसंघात विकास झालेला नाही.
मतदारसंघातील जातीय समीकरणे
धुळे लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणांचे अवलोकन केले तर मराठा पाटील समाजाचे सर्वाधिक प्राबल्य दिसते. धुळे लोकसभा मतदार संघाची २००९ साली पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदार संघ खुला झाला होता. त्याआधी तो आदिवासी संवर्गासाठी राखीव होता. या मतदार संघात २००९ नंतर मोठा बदल झाला. याला मुख्य कारण म्हणजे भाजपने जातीय समीकरणांचा आधार घेत मराठा पाटील समाजाचा उमेदवार देण्यावर भर दिला. मात्र, काँग्रेसने अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व देत उमेदवारी दिली. ही जातीय समीकरणे काँग्रेसच्या पचनी न पडल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २००९ साली भाजपने प्रताप सोनवणे आणि २०१४ साली डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसने शिरपूरचे विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल यांना उमेदवारी दिली. मात्र, जातीय समीकरणांच्या गणितात अमरीश पटेल यांचा पराभव झाला. २००९ साली प्रताप सोनवणे हे १९ हजार ४२९ तर २०१४ साली डॉ सुभाष भामरे हे १ लाख ३० हजार ७२३ मतांनी विजयी झाले होते.
यावेळी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरुद्ध पाटील समाजाचे कुणाल पाटील हे उमेदवार आहेत. १० वर्षांनंतर या मतदारसंघात मराठा पाटील समाजाचे २ तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर आले आहेत. या मतदार संघात साडेअठरा लाख मतदार आहेत. त्यापैकी ५ लाख मतदार मराठा- पाटील समाजाचे आहेत. गेल्या निवडणुकीत डॉ भामरे यांना जातीय समीकरणांचा लाभ झाला होता, मात्र यंदा आमदार कुणाल पाटील हे निवडणूक रिंगणात असल्याने मराठा - पाटील समाजाच्या मतविभागणीचा धोका अटळ मानला जात आहे. यामुळे या निवडणुकीत जातीय समीकरणांचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र निहाय आढावा
धुळे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र येतात. त्यामध्ये धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य , मालेगाव बाह्य, आणि सटाणा या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो.
- धुळे शहर - अनिल गोटे (भाजप बंडखोर)
- धुळे ग्रामीण - कुणाल पाटील (काँग्रेस)
- मालेगाव मध्य - आसिफ शेख (काँग्रेस)
- मालेगाव बाह्य - सहकार राज्यमंत्री दादा भुसे (शिवसेना)
- सटाणा - दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)
- शिंदखेडा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल (भाजप)
मतदारसंघातील प्रश्न
मतदारसंघात गेल्या अनेक वर्षात औद्योगिक विकास झालेला नाही. रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नाहीत. तसेच याठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर असून शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळालेला नाही. धुळे लोकसभा मतदारसंघ हा कांदा आणि डाळिंब उत्पादकांचे आगार समजले जाते. मात्र, याठिकाणचा कांदा उत्पादक शेतकरी आणि डाळिंब उत्पादक शेतकरी हा नेहमीच मागासलेला राहिला आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याची तक्रार येथील शेतकरी करतात. धुळे लोकसभा मतदारसंघात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा. मतदारसंघात औद्योगिक विकास व्हावा अशी मागणी येथील मतदारांकडून केली जाते.
या मतदारसंघात मुबलक पाणी, महामार्गाचे चौपदरीकरण, रेल्वे आणि विमान सेवा, औद्योगिकीकरणाला पोषक स्थिती, उपलब्ध मनुष्यबळ, रोजगारक्षम औद्योगिक प्रकल्प असे विकासाचे आश्वासन देण्यात येथील प्रस्थापित आणि सत्ताधारी पक्षांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. मात्र सर्वांगिण विकासासाठी लागणार निधी आणि अनुशेषाचा प्रश्न मात्र सोडविण्याबाबत कोणीही बोलताना दिसत नाही.
बंडखोर अनिल गोटेंचे आव्हान
यावेळच्या डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यासमोर भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांचे मोठे आव्हान आहे. आमदार अनिल गोटे हे अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमदार अनिल गोटे यांच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलू शकतात. अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे आता काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघातील लढत ही अटीतटीची समजली जात आहे. भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे, काँग्रेसचे कुणाल पाटील आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यात होणाऱ्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.