धुळे - जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 48 अहवालांपैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 318 झाली आहे. एकाच दिवसात तब्बल 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 48 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 318 झाली आहे. आतापर्यंत 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील 14 आणि ग्रामीण भागात 14 जणांचा मृत्यू झाला असून, 159 जणांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मंगळवारी तब्बल 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 45 दिवसात प्रथमच रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. साक्री तालुका कोरोनामुक्त झालेला असताना रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.