धुळे - शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावात २ गटात झालेल्या हाणामारीत एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजकीय वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज महाजन असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय आवारात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत नातेवाईकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावात २ गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत या गावातील मनोज उत्तम महाजन ( वय ३८) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मनोज महाजन यांच्या नातेवाईकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
राजकीय वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी नातेवाईकांची समजूत काढून जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नाही असे पटवून दिले.
यानंतर मनोज महाजन यांचे पार्थिव धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा खून केल्याचा आरोप मनोज महाजन यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेऊन आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.