धुळे - हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारणी केली जात असून त्यासाठी धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी एक कोटीचा निधी दिला आहे. आज हा निधी खासदार डॉ. भामरेंनी जिल्हाधिकारी संजय यादव आणि हिरेच्या डीन डॉ. पल्लवी सापळे, डॉ. दीपक शेजवळ यांना सुपूर्द केला.
कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून शासन-प्रशासनासह सर्वचजण कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरले आहे. कोरोनाची लढाई लढताना ऑक्सिजन पुरवठा हे महत्त्वाचे शस्त्र आहे. प्रशासनाच्या माध्यमातून चांगला लढा दिला जात आहे. तिसरी लाटही येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरू असले तरी ते पूर्णत्वास जाण्यासाठी वेळ लागेल. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयावर धुळ्यासह नंदुरबार, मालेगावच्याही रुग्णांचा ताण आहे. म्हणून तेथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची गरज होती. ते लक्षात घेऊन मी माझ्या खासदार निधीतून १ कोटी रुपये या प्रकल्प निर्मितीसाठी देत आहे, असे भामरे म्हणाले.
सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी काय दिले?
भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल म्हणाले, की धुळे जिल्ह्यात ५ आमदार आणि १ खासदार आहे. त्यातील ३ आमदार भाजपचे आहेत. भाजपच्या आमदार, खासदारांनी ऑक्सिजन प्रकल्प आणि कोरोनासाठी भरीव निधी दिला. काँग्रेसच्या एकमेव आमदाराची सत्ताधारी असूनदेखील का बोंब पडली नाही. एमआयएमचे आमदार डॉ. फारुक शाह यांनी केवळ पत्रक बाजी केली आहे. ते जर पुढाकार घेत असतील तर त्यांचे अभिनंदनच करू, त्यांनी एमआयडीसीमधील जागा प्रकल्पासाठी देऊ केली आहे. मुळात ती जागा त्यांची नसून एमआयडीसीची आहे. त्यांनी ती जागा प्रथम शासनाकडे वर्ग करावी त्यानंतर निधीतून प्रकल्प उभारावा त्यांचे अभिनंदनच करू, आरोग्यमंत्री राजेश टोपे धुळ्यात आले, केवळ त्यांनी बडबड केली. कोरोना काळात राजकारण करू नये असे आवाहनही अग्रवाल यांनी केले. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, नारायण पाटील, बापू खलाणे, कामराज निकम आदी उपस्थित होते.