धुळे - मनसेतर्फे शहरातील महाराणा प्रताप चौकात हाथरस अत्याचार प्रकरणातील नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली.
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील एका दलित समाजातील मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या केली होती. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त होत आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संपूर्ण देशभरातून करण्यात येत आहे.
तसेच, या प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने अहवाल देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा देखील सर्वत्र निषेध व्यक्त होत असून, भाजप सरकारविरुद्ध देखील संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा- सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यासाठी मनसेकडून धुळे शहरात आंदोलन