धुळे - भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात बंडखोरी करत त्यांनी उमेदवारी केल्याने पक्षाने ही कारवाई केली आहे. मात्र, पक्षाने कारवाई करण्यापूर्वीच अनिल गोटे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीपासून आपल्या पक्षातील नेते आणि मंत्र्यांना लक्ष्य करत सरकारला घरचा आहेर दिला होता. भाजपचे अंतर्गत वाद त्यांनी थेट विधानसभेत उपस्थित करत चव्हाट्यावर आणले. यासोबत अनिल गोटे यांनी मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग अशा कामांबाबत आपल्या पक्षातील मंत्र्यांना त्यांनी वेळोवेळी धारेवर धरले. अनिल गोटे यांच्यातील आणि मंत्री गिरीष महाजन, डॉ सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यातील संघर्ष अधिक धारदार बनत गेला.
भाजपात राहून अनिल गोटे यांनी विरोधाची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी डॉ. सुभाष भामरे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत आपली उमेदवारी जाहीर केली. अनिल गोटे यांच्या या पक्षविरोधी कारवायांमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र, अनिल गोटे यांनी याआधीच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला होता. एकंदरीतच अनिल गोटे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केल्याचे बोलले जात आहे.