धुळे - धुळे महापालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सत्ताधारी भाजपमधील ओबीसी समाजातील नगरसेवकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. यामुळे आता महापौरपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील 27 महापालिकांमधील महापौरांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात आली. यात धुळे महापालिकेच्या पुढील अडीच वर्ष कालावधीसाठी ओबीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. शासनाच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
धुळे महापालिकेत विद्यमान महापौर हे खुल्या प्रवर्गातील असून, त्यांचा कार्यकाळ पुढील डिसेंबर महिन्यात १ वर्षाचा होईल. अजून दीड वर्षानंतर नवीन आरक्षणानुसार ओबीसी राखीव प्रभागातील नगरसेवक महापौर पदावर विराजमान होऊ शकेल. धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील कोणत्या नगरसेवकाची पुढील महापौर म्हणून वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.