धुळे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना जेवण देण्याचा उपक्रम भाजपच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. मात्र, यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे भाजपच्या वतीने जेवणाची पाकिटे तयार करण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाचा धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मात्र, यावेळी सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत सोनार या लोकप्रतिनिधींनी स्वतः मास्कचा वापर केला नव्हता. तसेच हॅन्ड ग्लोज न लावता त्यांच्या हातून जेवणाची पाकिटे तयार करण्यात आली. त्याबरोबरच यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपच्या कार्यक्रमातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहयला मिळाले आहे.
त्यामुळे एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन सर्वसामान्य नागरिकांना करत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला.