धुळे - राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, लॉकडाऊनच्या या काळात रात्रीच्या वेळी शेतीमालाची वाहतुक होताना काही गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. धुळ्याच भाजीपाल्याची वाहतुक करणाऱ्या वाहनातून चक्क देशी दारूची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी या प्रकरणी एका वाहनासह सुमारे सहा लाखांची दारू जप्त केली आहे.
हेही वाचा... रुग्णवाहिका आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन जण जागीच ठार..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक सेवेच्याच्या नावाखाली काही मंडळी अवैधरित्या दारू वाहतुकीचा गोरखधंदा करताना दिसत आहेत. अशीच गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांनी त्या माहितीवरुन मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचला. रविवारी रात्री पोलिसांनी फळे, भाजीपाला यांची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यात भाजीपाल्याऐवजी कॅरेटखाली देशी दारूचे 45 बॉक्स आढळुन आले.
पोलिसांनी जप्त केलेल्या या दारूची किंमत एक लाख बारा हजार रुपये असून वाहनाची किंमत पाच लाख रुपये आहे. असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.