धुळे - संपूर्ण खानदेशात कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त खानदेशात चैतन्यमय वातावरण अनुभवायला मिळाले.
संपूर्ण खान्देशात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. हा उत्सव फक्त खान्देशात साजरा केला जातो. कानबाईची रविवारी स्थापना करून रात्रभर जागरण केले जाते. सोमवारी वाजतगाजत मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. कानबाईला कानुमाता देखील म्हटले जाते. खान्देशात होऊन गेलेल्या कण्हेर राजाची पत्नी म्हणून पुराणात तिचा उल्लेख सापडतो. कानबाई एक दिवसासाठी आपल्या माहेरी येते, माहेरी आल्यावर तिचा साग्रसंगीत सन्मान करून तिचा महिमा गायला जातो, अशी आख्यायिका सांगितली जाते. कानबाई उत्सवानिमित्त खान्देशात चैतन्यमय वातावरण आहे.