धुळे - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने विशेष कक्षाची आणि पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता राजकुमार सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
कोरोना विषाणूने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात या आजाराचे आतापर्यंत ७ रुग्ण रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या आजाराने बाधित रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय सर्वोपचार रुग्णालयात कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात अद्ययावत यंत्रणेसह औषधांचा साठा करण्यात आला आहे. तसेच, यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून या पथकाला प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालय आवारात वेळोवेळी स्वच्छता केली आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना योग्य ती खबरदारी घेण्याच आवाहनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी आजाराला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, स्वच्छता ठेवावी असे आवाहन धुळे जिल्हा सर्वोच्च रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - कुक्कुट व्यवसायिकाला कोरोनाने रडवले
हेही वाचा - भाऊचा धक्का ते मांडवा 'रोरो बोटी'ची चाचणी सुरू, 'प्रोटो प्रोसेस' मांडवा बंदरात