धुळे- जिल्ह्यात 'मागेल त्याला शेततळे' या योजनेंतर्गत यंदा ५०० शेततळी निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र या योजनेअंतर्गत गेल्या ५ महिन्यात फक्त १५० शेततळ्यांची निर्मिती करण्यात झाली आहे. धुळे जिल्ह्यात अल्पभुधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून सिंचन विहिरींना सहज मिळणाऱ्या मंजुरीमुळे ही योजना मंदावल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाच्या वतीने सन २००८-०९ साली 'मागेल त्याला शेततळे' ही योजना सुरू करण्यात आली होती. गेल्या १० वर्षात संपूर्ण धुळे जिल्ह्यात ३ हजार शेततळ्यांची उभारणी झाली असून यंदा ५०० शेततळ्यांचं उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या योजनेसाठी ९४७ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव शासनाकडे सादर केले असून त्यापैकी ४६३ शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ३१९ शेततळ्यांची कामे सुरू झाली असून त्यापैकी १५० शेततळे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांची उभारणी होणे गरजेचे आहे. या योजनेबाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती देऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.