धुळे - शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
राज्यात घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ शांत झाल्याचे वृत्त आल्यानंतर हवामान खात्याने पुढील काही तास राज्यातील काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला होता. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून काही भागात मुसळधार पावसाची शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तवली होती. चक्रीवादळ जळगाव जिल्ह्यामार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झाल्यानंतर दुपारी मान्सूनपूर्व पावसाने धुळे शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली.
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून काही भागात गारपीट होण्याची शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तवली. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने कोणतेही नुकसान झाले नसून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामापूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.