धुळे- शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सोमवारी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली.
हेही वाचा-शिरपूर स्फोट प्रकरण : दुर्घटनेची जबाबदारी कंपनीने घेतली - संजय वाघ
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होते. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून होते. आज सोमवारपासून या उत्सवाला सुरुवात झाली. धुळे शहर आणि जिल्ह्यात गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. गणरायाची मूर्ती आणि पूजेचे साहित्य विकत घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून बाजारात गर्दी केली होती. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. गणरायाच्या उत्सवासाठी प्रत्येकजण आपल्या घरी सुंदर आरास साकारत असतो. ही आरास करण्यासाठी लागणारे साहित्य, पूजापत्री, पूजेसाठी लागणारी फुले, यासह अनेक वस्तूंची दुकाने थाटली होती. बाप्पाला घरी नेण्यासाठी अनेकांनी ढोलपथक निमंत्रित केले होते. पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अनेकांनी यंदा शाडूच्या मातीला पसंती दिली. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर शाडूच्या मुर्ती दाखल झाल्या होत्या. मातीचे वाढते भाव लक्षात घेता यंदा मूर्तीच्या किंमतीत सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.