धुळे - महाराष्ट्राला लोकसंस्कृतीची खूप मोठी परंपरा लाभली आहे. ही लोकसंस्कृती विविध प्रश्नांबाबत जनजागृतीचे काम यासोबत मनोरंजनाचे देखील काम करते. या संस्कृतीतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. यातीलच एक प्रकार म्हणजे भल्या पहाटे दारासमोर घेऊन देवाची गाणी म्हणणारा वासुदेव गोंधळी.
हे वासुदेव गोंधळी भक्तीचा महिमा आपल्या गाण्यातून सांगतात. तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर देखील गाण्यातून भाष्य करतात. सध्या संपूर्ण देशाला कोरोना या आजाराने कवेत घेतले आहे. या आजारामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले असून याबाबत जनजागृती करण्याचे काम धुळे शहरातील किसन गोंधळी हे करत आहेत. आपल्या गोंधळातून या आजाराबाबत माहिती देऊन नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन ते करीत आहेत. यासोबत आई कुलस्वामिनी एकवीरा देवीने या आजाराला हद्दपार करण्याचं साकडं त्यांनी देवीला घातलं.