धुळे - शहरातील अग्रसेन चौकात असलेल्या गॅस एजन्सीवर रविवारी सकाळी आलेल्या ५ ते ६ जणांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना भरदिवसा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेदेखील नुकसान केले.
धुळे शहरातील अग्रसेन चौकात असलेल्या एकलव्य गॅस एजन्सीवर आज सकाळी ५ ते ६ जण एका मारुती अल्टो कारने आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या या टोळीने तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांनी दुकानात शिरताच लाईट बंद केले. त्यातल्या २ जणांनी वॉचमन तुकाराम मुकुंदा पाटील यांना बंदुकीचा धाक दाखवला. तसेच अन्य दरोडेखोरांनी पहिल्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापून पाठीमागील दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत लाकडी कपाटातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या दरोडेखोरांकडे धारदार शस्त्रे होती, अशी माहिती वॉचमन तुकाराम मुकुंदा पाटील यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले असून दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.