धुळे - जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आधीच दुष्काळामुळे होरपळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहीला आहे. त्यातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यामुळे दरवर्षी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी होणारी पालकांची गर्दी ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम मिळत नसल्याने दैनंदिन खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात कष्टकरी आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आता मुलांच्या शैक्षणिक खर्चाची भ्रांत पडली आहे.
दरवर्षी बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा दुष्काळामुळे बाजारात होणारी गर्दी ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांनी शैक्षणिक साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बाजार ओस पडले आहेत. बाजारातील या मंदीमुळे व्यावसायिकांनीही खंत व्यक्त केली आहे.