धुळे - काँग्रेस आणि भाजप उमेदवारांच्या समर्थकांकडून सुरु असलेला प्रचार म्हणजे कौटुंबीक हेव्यादाव्यांच्या फाटक्या गोधड्या धुण्याचा धोबीघाट झाला आहे. त्यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दा नाही, अशी टीका आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांवर केली आहे. घराण्याचा वारसा सांगून मी निवडणूक लढवत नसून विकासाच्या मुद्दयांवर लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे.
आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून विरोधकांवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढणार असल्याचे पत्रक त्यांनी काढले आहे. या पत्रकातून गोटे यांनी रोहिदास पाटीलांवर टीका केली असून पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात दूध उत्पादक संघ, सूतगिरणी यासह विविध संस्थांची दिवाळखोरी कशा पद्धतीने केली, यावर टीका केली आहे. तसेच या पत्रकात कुणाल पाटील यांचा उल्लेख गोटे यांनी "राजा के बेटे, इलेक्शन मी खडे" अशा पद्धतीने केला आहे.
गोटे यांनी डॉ. सुभाष भामरे यांच्यावर देखील टीका केली असून डॉ. भामरे हे २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेवर विजयी झाले. मात्र, माझी उमेदवारी ही विकासाच्या मुद्दयांवर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर २ वर्षात मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात केली जाईल. तसेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचा शुभारंभ केला जाईल, असे आश्वासन त्यांनी या पत्रकातून दिले आहे.