धुळे - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सोमवारी १ हजार २५५ मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली. न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जात असल्याने प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी उपलब्ध करून द्यावे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
हेही वाचा - धुळे : भाजपच्या निषेधार्थ काँग्रेसचे साक्रीत धरणे आंदोलन
धुळे जिल्हा परिषदेची मुदत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये संपली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल याचिकेमुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. तसेच, शासनाला त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सरकारने म्हणणे सादर न केल्याने निवडणुकीची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना करण्यात आली. त्यानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवारी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध झाली. धुळे जिल्ह्यातील ५६ आणि ११२ गणांमधील १ हजार २५५ मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा - धुळ्यात पोलिसांनी जप्त केला 6 लाख रुपये किमतीचा सुका गांजा
साक्री तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३९६ मतदान केंद्र, शिंदखेडा तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच २४० मतदान केंद्र आहेत. शिरपूर तालुक्यात २८१ आणि धुळे तालुक्यात ३२२ मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात साधारणपणे १ हजार ४०० मतदार आहेत. त्यापेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदारांचा समावेश दुसऱ्या केंद्रात करण्यात आला आहे. मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध झाल्याने आता कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.