धुळे - जिल्ह्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. खान्देशाला दुष्काळमुक्त करण्यासाठी गेल्या ५ वर्षात आम्ही अनेक कामे केली, यापुढे देखील करत राहू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. महाजनादेश यात्रेच्या दोंडाईचा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे आज (गुरूवार) जाहीर सभा पार पडली. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुभाष भामरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आम्ही ज्यावेळी विरोधी पक्षात होतो त्यावेळी संघर्ष यात्रा काढली. आज आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही संवाद यात्रा काढली आहे. गेल्या ५ वर्षातील विकास कामांचा लेखा जोखा या यात्रेच्या माध्यमातून मांडत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
धुळे जिल्ह्यातील सुलवाडे-जामफळ योजनेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला गेला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या जिल्ह्यातील सिंचनाचे अनेक प्रश्न सोडवले. या जिल्ह्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.