धुळे - सेतू कार्यालयातील एका ३५ वर्षीय कर्मचारी महिलेसमोर लज्जास्पद कृत्य करणारे पिंपळनेरचे तहसीलदार विनायक थविल यांच्यावर शुक्रवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांचा हस्तक संदीप मुसळे याच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महिलेसमोर लज्जास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न -
अपर तहसीलदार थविल हे नेहमी काहीतरी कामाच्यानिमित्ताने या महिलेला सायंकाळ नंतर घरी बोलावयाचे. परंतु त्या महिलेने कुठल्याच मागणीला दाद दिली नाही. काही दिवसांपूर्वी थविल याने संदीप मुसळे याच्या माध्यमातून या महिलेला भेटीसाठी बोलविले होते. दरम्यान, ती महिला कामानिमित्त अपर तहसीलदारांच्या दालनात गेली असता, तिच्यासमोर लज्जास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न थविल यांनी केला. अखेर या त्रासाला कंटाळून महिलेने पिंपळनेर पोलिसांत तहसीलदार आणि त्यांच्या हस्तकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सेतूला नोटीस दिल्याने गुन्हा? -
दरम्यान, तहसीलदार यांनी या महिलेकडे पैशांची मागणीही केली होती. मात्र, संबंधित महिलेने थविल याला कुठलीही दाद दिली नाही. या महिलेचा पती मजूर असून, 'सेतू' सेवेच्या माध्यामातून महिलेच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तर याबाबतचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे तहसीलदार विनायक थविल यांनी म्हटले. सेतूला नोटीस दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अभियंत्याला चोवीस लाखांचा गंडा, गुन्हा दाखल