धुळे - बस आणि दुचाकीचा भिषण अपघात झाल्याची घटना शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संतोष चौरसिया (वय 31 वर्ष राहणार हमाल मापाडी, धुळे) असं या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे. घटनेची माहितीच मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
संतोष चौरसिया हे आपल्या आईसोबत नातेवाईकांच्या घरी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते, दरम्यान यावेळी समोरून आलेल्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौरसिया यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केली.
नागरिकांकडून गतिरोधक बसवण्याची मागणी
या परिसरात अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधकांची अवश्यकता आहे. या परिसरात गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिक वारंवार पीडब्लूडी विभागाकडे करत आहेत. मात्र पीडब्लूडी विभागाकडून नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे. या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे पीडब्लूडी विभागाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन गतिरोधक बसवावेत अशी मागणी यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केली आहे.