धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे जुने भामपूर येथील पांढरीचा नाल्याकाठची खळवाडी पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली. दोन म्हशी, तीन बैलांचा पुरात मृत्यू झाला असून लाखो रुपयांचा चारा, शेती अवजारे, खते, पाईप आणि गोठे पाण्यात वाहून गेले. ४० वर्षात प्रथमच असा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. महिला शौचालयाची संरक्षण भिंत जमीनदोस्त झाली. वाघाडी ते विखरण परिसरात शेती पाण्याखाली असून नाले भरून वाहत आहेत. उखळवाडी आणि मुखेड या दोन लघु प्रकल्पामधून निघणारे नाले भामपूरजवळ एकत्र येतात. मध्यरात्री अडीचला या परिसरात ढगफुटीमुळे नाल्यात पाण्याचा लोंढा तयार झाला. पाईप मोरीवरून पाणी वाहत असल्यामुळे गावकऱ्यांना गुरे, गोठे वाचवण्यासाठी जाणे अशक्य झाले. जुने भामपूर गावात झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. यापूर्वी 23 जूनला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांना ही घटना घडली. बैलजोड्या, शेती अवजारे वाहून गेल्याने पेरणी कशी करावी असा प्रश्न या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
साहेबराव चैत्राम पवार -दोन बैल, संपूर्ण गोठा, चारा, शेती अवजारे,संतोष चैत्राम पवार-गुरांचा चारा, गोठा, शेती अवजारे,गोपीचंद चिंतामण पाटील-दोन म्हशी, शेती अवजारे, गोठा, चारा,प्रकाश मोरचंद पाटील-एक बैल, चारा, गोठा, अवजारे यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यात खळवाडीतील जवळपास ४८ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर पशुधन आणि अवजारे यांचं नुकसान झाल्याने शेतकरी राजा खचला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.