धुळे - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा भाजपच्यावतीने चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रात 57 टक्के ओबीसी समाज आहे. या समाजातील अनेक समाज बांधवांना सर्वच राजकीय पक्षातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय प्रवासातून समाजसेवा करण्याची संधी मिळत होती. परंतु, न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट असताना महाविकास आघाडी सरकारने न्यायालयापुढे योग्य माहिती दिली नाही. योग्य पद्धतीने बाजू न मांडल्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिला असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भाजपच्यावतीने चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी आंदोलनस्थळी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
- शरद पवार भविष्यवक्ते आहेत- सुभाष भामरे
अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशी संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता, डॉ. सुभाष भामरे यांनी सरळ टोला देत शरद पवार भविष्यवक्ते आहेत असे ते म्हणाले. तसेच ईडी, सीबीआय हे त्यांची कामं करत आहेत. सीबीआयला हायकोर्टाने आदेश दिले आहेत. सीबीआय चौकशीतून काय निष्पन्न होणार याची चिंता पवार साहेबानी करू नये, असे वक्तव्य डॉ. सुभाष भामरे यांनी केले.