धुळे - विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ विकास ठेलारी संघातर्फे धुळे येथील उप-वनविभाग कार्यालयावर बिर्हाड मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांना राज्य शासनातर्फे चराईसाठी हजारो हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत वनविभागातर्फे ही आरक्षित जमीन दाखवण्यात आलेली नाही. त्यामुळे मेंढपाळांना आपली जनावरे चारण्यासाठी दुसऱ्याच्या शेताजवळ जावे लागत. तेव्हा मेंढपाळांना शेतकऱ्यांच्या आक्रोशाला देखील सामोरे जावे लागत आहे.
आरक्षित जागेसंदर्भात महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ विकास ठेलारी महासंघातर्फे वनविभागात विनंती अर्ज दिले. मात्र वनविभागाकडून कुठलीही भूमिका अद्याप स्पष्ट केली जात नाही. त्यामुळे आज मेंढपाळांना सोबत घेऊन ठेलारी महासंघ यांनी थेट उपवन संरक्षण कार्यालय धुळे येथे बिऱ्हाड मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी वन विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली.