धुळे : जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर गावाजवळ असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागली असून, चार मजूर महिलांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये मायलेकीचा समावेश आहे. दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटना काय आहे? : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील चिखलीपाडा येथे मेणबत्ती तयार करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात एका मुलीसह एक महिला या आगीत गंभीर भाजली असून त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चौघांचा जागीच मृत्यू : निजामपूर परिसरातील चिखलीपाडा परिसरात 25 बाय 25 पत्र्याचे मेणबत्त्या बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात साक्री तालुक्यातील जैताणे गावातील महिला कामगार काम करत होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारखान्यात काम सुरू असताना अचानक कारखान्यात आग लागली. या आगीची ठिणगी स्पार्कल मेणबत्त्या बनवण्याच्या कच्च्या मालावर पडली. यामुळे आग आणखी भडकली. त्यात त्या ठिकाणी काम करणाऱ्या आशाबाई भैय्या भागवत (वय ३४), पुनम भैय्या भागवत (वय १६), नयनाबाई संजय माळी (वय ४८), सिंधुबाई धुडकू राजपूत (वय ५५ रा. जैताणे जिल्हा साक्री) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर संगिता प्रमोद चव्हाण (वय ५५) ७० टक्के होरपळल्या आहेत. निकिता सुरेश महाजन (१८ वर्षे) ३० टक्के भाजल्या असून दोघीनांही नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्पार्कल मेणबत्त्या बनवण्याच्या या कारखान्याच्या अपघाताप्रकरणी जगन्नाथ रघुनाथ कुवर, रा. वासखेडी जिल्हा साक्री यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हा कारखाना चालवण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत.