धुळे - आपल्या मुलाने एखाद्या क्षेत्रात यश मिळवल्यास त्याचा सर्वाधिक आनंद आईला होत असतो. मात्र, त्याच मुलाच्या हातून एखादी चूक झाल्यास वेळप्रसंगी तीच आई कठोर होऊन मुलाला रागवत असते. मात्र, या रागवण्यामागील प्रेम आणि काळजी ही फार कमी मुलांना कळते. आईच्या रागवण्यातून अनेक वेळा चुकीचं पाऊल मुलांनी उचलण्याच्या घटना समाजात घडत असतात. या घटना अत्यंत क्लेशदायक देखील असतात. असाच काहीसा प्रकार धुळे जिल्ह्यात घडल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - 'राजकारण्यांनी सत्तेचा सारीपाट थांबवून आमच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे'
औरंगाबाद येथील माधुरी संजय कांबळे यांचा 19 वर्षीय मुलगा गोलू संजय कांबळे हा गेल्या पाच वर्षांपासून बेपत्ता होता. आई रागावल्याच्या क्षुल्लक कारणावरून तो घर सोडून निघून गेला होता. गोलू हा शिरपूर येथील अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहात लहानाचा मोठा होत होता. 2014 पासून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे काम शिरपूर येथील अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहाच्या माध्यमातून सुरू होते. अखेर त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात बालगृहाला यश आले.
हेही वाचा - धुळे महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित
गोलूच्या वडिलांचेही निधन झाले असल्याने बेपत्ता झालेल्या मुलाच्या चिंतेत माधुरी कांबळे ह्या आपलं जीवन व्यतीत करत होत्या. आपला मुलगा कधीतरी आपल्याला भेटेल या विश्वासावर त्या येणारा प्रत्येक दिवस जगत होत्या. मात्र, आईची मुलाशी जुळलेली नाळ ही त्यांना आयुष्यात कधीही वेगळं करू शकत नाही, याचाच प्रत्यय धुळे जिल्ह्यात पहावयास मिळाला. घर सोडून गेलेल्या गोलूच्या आईचा शोध घेण्यात बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गोलूला त्याच्या आईकडे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या उपस्थितीत स्वाधीन करण्यात आले. यावेळी माता-पुत्राच्या भेटीने गोलू आणि त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. गोलू अनाथ आश्रमात वाढत असताना त्याने गोळा फेकच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.