चंद्रपूर - आपल्या लेकरासाठी आई काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले. आपल्या चिमुकलीला बिबट्याच्या तावडीत पाहिल्यानंतर, वाघाचे काळीज असलेल्या आईने थेट बिबट्यावरच झडप घेतली. जोवर बिबट्या मुलीला सोडत नाही तोवर तिने बिबट्यावर प्रहार सुरू ठेवला. अखेर बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि तो जंगलात पळून गेला. मुलीला त्याच्या तावडीतून वाचवूनच या शूर मातेने श्वास घेतला, ही घटना आहे जुनोना गावातील.
चंद्रपूर शहरालगत जंगलाने वेढलेले जुनोना गाव आहे. याच गावात मेश्राम कुटुंब राहते. आई अर्चना मेश्राम मुलीसह गावालगत नाल्याजवळ रानभाज्या तोडण्यासाठी गेली. भाज्या तोडत अर्चना समोर निघून गेली, पण पाच वर्षांची चिमुकली प्राजक्ता तिच्या नजरेच्या टप्प्यात होती. एवढ्यात तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या प्राजक्तावर झडप घातली आणि तिचे शीर जबड्यात धरले.
अचानक झालेल्या या हल्ल्याने आई अर्चना जराही न घाबरता मुलीच्या सुटकेसाठी धावली. तिथे पडलेली लाकडाची काठी उचलून सर्व शक्ती एकवटून बिबट्यावर जोरदार प्रहार करू लागली. तेव्हा बिबट्याने तिच्यावरही हल्ला चढवला. पण काठीच्या मदतीने हा हल्ला तिने परतावून लावला. मातेच्या या रुद्रावतारापुढे बिबट्याला शेवटी माघार घ्यावी लागली. पण बिबट्याने पुन्हा दुसऱ्या वेळेस चिमुकलीला पकडत फरफटत नेऊ लागला. आता मात्र आई अर्चनाची 'दुर्गा' झाली होती. तीने पुन्हा बिबट्यावर प्रहार केल्यावर बिबट्या पसार झाला.
घटनेनंतर जखमी अवस्थेतील बेशुद्ध प्राजक्ताला घेऊन आईने तातडीने रुग्णालय गाठले. चंद्रपुरात उपचार झाल्यावर सध्या प्राजक्ता नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात चेहऱ्याच्या पक्षाघातावर उपचार घेत आहे. पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी या मातेने जीवाची बाजी लावली आणि मृत्यूच्या रुपात आलेल्या बिबट्याला आईमध्ये दडलेली दुर्गेचे रूप दाखवले. जखमी प्राजक्ताला तातडीने बरे करण्यासाठी डॉक्टर आता प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा - चंद्रपूरमध्ये बिबट्याची दहशत; हल्ल्यात केल्या 12 बकऱ्या ठार
हेही वाचा - Video : दारुबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली विजय वडेट्टीवारांच्या फोटोची आरती