चिमूर (चंद्रपूर) - नवरगाव उपवनक्षेत्रातील पेंढरी (कोके) गावाला लागून असलेल्या जंगल परिसरातील दिवान तलावाजवळ महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला तेंदुपत्त संकलनासाठी जंगल परिसरात गेली होती. सिताबाई गलाब चौके (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे.
तेंदुपत्ता संकलनातून रोजगार
पेंढरी, मोठेगाव, केवाडा, गोदेडा, वडसी या गावा लगत असलेल्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांच्या वावर आहे. या परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना नेहमीच्या झाल्या आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्याची दहशत या परिसरात नेहमीच सतावत असते. गोरगरीब जनतेसाठी दरवर्षी रोजगाराचे साधन असलेल्या तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू झाले आहे. जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलनासाठी नागरिक जात असतात.
'वाघाचा बंदोबस्त करा'
नवरगाव उपवनक्षेत्रातील पेंढरी (कोके) गावाजवळील जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलनासाठी गावातील काही महिला गेल्या होत्या. दिवान तलाव परिसरात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या सिताबाई गुलाब चौके (५५ वर्ष, रा. पेंढरी-कोके) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना 11च्या सुमारास घडली. घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कारवाई सुरू केली होती. वनविभागाने मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देवून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.