चिमूर - महिलेचा पदर हा अब्रू झाकण्याची, मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी सांभाळण्याची भारतीय परंपरा आहे. मात्र अनेकदा अनावधानाने किंवा गडबडीने हाच पदर मृत्युचे कारण ठरतो. तालुक्यातील खडसंगी येथील शेतात असाच एक प्रकार घडला. थ्रेशरमध्ये तुरीच्या पेंढीसह अनावधानाने पदर अडकून आणि त्याचा गळयाभोवती घट्ट फास आवळल्याने ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चिंधाबाई वसंत तराडे असे मयत महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कडक नियमावली जाहीर
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील चिंधाबाई वसंत तराडे ही महिला आपल्या परिवारासह स्वतःच्या शेतात कापून ठेवलेली तुरी व हरभरा थ्रेशर मशीनद्वारे काढत होती. हे काम करत असताना पेंढी सकट लुगडयाचा पदर मशीनमध्ये अडकला. काही समजण्यापूर्वी गळ्याभोवती फास घट्ट झाला. यात जागेवरच सदर महिलेचा मृत्यू झाला. मात्र निपचित पडलेली महिला जिंवत असावी, असे समजून कुटूंबियांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे तिला उपचाराकरता नेले. परंतू डॉक्टरांनी महिलेस मृत घोषित केले. मृत महिलेच्या मागे दोन मुले आणि परिवार आहे.